सिल्लोड (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील घटांब्री येथील नवविवाहित दाम्पत्याने रविवारी (दि.११) वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. अगोदर पत्नीने राहत्या घरी साडेअकरा वाजता गळफास घेतला, तर पोस्टमास्तर असलेल्या पतीने दीड वाजता बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली गळफास घेतला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विकास गणपत तायडे (वय २६) व सपना विकास तायडे (२१) अशी त्यांची नावे आहेत.
घटांब्री येथील रहिवासी तथा चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथे पोस्टमास्तर असलेल्या विकास गणपत तायडे यांचा विवाह आठ महिन्यांपूर्वी एप्रिल २०२२ रोजी दहिगाव येथील सपनासोबत झाला होता. काही दिवसांपासून ते दोघे कुटुंबीयांपासून वेगळी खोली करुन अलिप्त राहत होते. दोघांचाही संसार सुखाचा सुरू असताना अचानक रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सपनाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यावेळी विकास तायडे हे सिल्लोडला मोटारसायकलची सर्व्हिसिंग करण्यासाठी गेलेले होते. त्यांना पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच त्यांनीसुद्धा रस्त्याने परत येताना अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली दुपारी १ वाजेच्या सुमारास गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनि. अजित विसपुते, बीट जमादार नीलेश शिरस्कर आदींनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या दोघा पती-पत्नीने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रविवारी रात्री घटांब्री येथे दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.