औरंगाबाद : शहरातील वाहन वितरकांना आता हेल्मेटशिवाय दुचाकी विकता येणार नाही. कारण दुचाकी विकताना हेल्मेट दिल्याची आता आरटीओ कार्यालयाकडून खात्री केली जाणार आहे. हेल्मेट दिलेले असेल तरच दुचाकींची नोंदणी होईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.
वाहनांसोबत हेल्मेट देणे, हे बंधनकारक आहे. शहरात अनेक वितरकांकडून हेल्मेट दिले जाते. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेनंतर नवीन वाहन नोंदणीच्या वेळी वाहनाच्या उत्पादकाद्वारे वितरकांमार्फत ग्राहकांना हेल्मेट देण्यासंदर्भात खातरजमा करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे नव्या दुचाकीसोबत हेल्मेट दिले गेले आहे, याची यापुढे आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक पडताळणी करतील. हेल्मेट दिलेले असल्याची खात्री झाल्यानंतर दुचाकींची नोंदणी करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालय सोमवारपासून याची अंमलबजावणी करणार आहे.
वितरकांना सूचनायासंदर्भात आरटीओ कार्यालयाने शहरातील वाहन वितरकांना सूचना केल्या आहेत. हेल्मेट दिलेल्या दुचाकींचीच नोंदणी केली जाईल. त्यामुळे वितरकांना हेल्मेटशिवाय दुचाकी विकता येणार नाही, अशी माहिती श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.---------