औैरंगाबाद : शहरातील सर्व मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. मागील चार महिन्यांपासून कंपनी काम सुरू करण्याच्या मुद्यावर महापालिकेला हुलकावणी देत आहे. १ डिसेंबर, ५ जानेवारीनंतर आता १५ जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आला आहे.
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिका कंपनीला दरवर्षी किमान ३० ते ३२ कोटी रुपये देणार आहे. सध्या कचरा उचलण्याचा खर्च वार्षिक ६८ कोटींपर्यंत पोहोचला आहे. बंगळुरू येथील कंपनीने एक टन कचरा उचलला तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात साधारणपणे ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी कंपनीने इन्दूर पॅटर्नप्रमाणे अत्याधुनिक रिक्षा आणाव्यात, कॉम्पॅक्टर, हायड्रोलिक वाहने आणावीत, असे सांगितले आहे. ही सर्व वाहने नवीन असावीत, कंपनीच्या नावावर असावीत, अशीही अट आहे. कंपनीला वर्कआॅर्डर देऊन चार महिने उलटले तरी अद्याप सर्व वाहने आलेली नाहीत. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी १ डिसेंबर २०१८ पासून कंपनीने किमान ३ झोनमध्ये काम सुरू करावे, अशी आॅर्डर काढली होती. आजपर्यंत कंपनीने कामच सुरू केले नाही. ५ जानेवारीपासून काम सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते.
आता १५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. शहरात एकाच वेळी काम सुरू करण्याचा मानस कंपनीचा आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती कंपनीला माहीत नाही. एकाचवेळी काम सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, कामगार कंपनीकडे उपलब्ध नाहीत. कंपनीने आतापर्यंत १० पैकी ५ कॉम्पॅक्टर आणले आहेत. ३०० रिक्षांपैकी १८ आणल्या आहेत. मनुष्यबळ फक्त ५० ते ६० उपलब्ध आहे. कंपनीच्या या नियोजनाचा फटका दरमहा महापालिकेला बसत आहे. महापालिकेचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीला काम देण्यात आले आहे.