छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ६९ तालुक्यांमध्ये खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ४२७ मंडळांतील पिके वाळून गेली होती. या शेतकऱ्यांना पीक विम्याचे २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले होते. या आदेशाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या विमा कंपनीने केराची टोपली दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
मराठवाड्यात काही तालुक्यांत आणि मंडळात तर २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला होता. पीक विमा कंपनीसोबत शासनाने केलेल्या करारानुसार पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर संबंधित मंडळातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ५७ कृषी मंडळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २० मंडळ, बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ५६ मंडळे, लातूर जिल्ह्यात ८ तालुक्यातील ३२ मंडळ, धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५७ मंडळ, नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ९३ मंडळांत आणि परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ५२ महसूल मंडळ अशी एकूण ६९ तालुक्यातील ४२७ मंडळांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, या मंडळातील खरीप हंगामातील कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. ही बाब कृषी अधिकारी, तहसीलदार आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट झाली होती. तेव्हा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार २४८ शेतकऱ्यांना ८५ कोटी २७ लाख ७९ हजार रुपये दिवाळीपूर्वीच अदा करणे विमा कंपनीला बंधनकारक होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरसाठी कार्यरत असलेल्या एम.एस. चोलामंडल विमा कंपनीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रिम जमा केली नसल्याचे दिसून येते.
पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाले ९३८ कोटी ३६ लाखमराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ४ लाख ३८,८४६ शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने आतापर्यंत १३६ कोटी ५७ लाख रुपये दिले आहे, तर २५ कोटी २७ लाख रुपये देणे बाकी आहे. बीड जिल्ह्यातील ७ लाख ७१ हजार ३३८ शेतकऱ्यांना २४१ कोटी ४७ लाख रुपये देय होते. यापैकी २१३ कोटी ४ लाख शेतकऱ्यांना अदा केले. २८ कोटी ४२ लाख ९० हजार रुपये देणे आहे. लातूर जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ९३ शेतकरी पीक विम्याच्या अग्रिम रकमेसाठी पात्र आहेत. त्यांना २१५ कोटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. संबंधित विमा कंपनीने लातूरच्या शेतकऱ्यांना १९७ कोटी रुपये अदा केले. १८ कोटी रुपये देय बाकी आहे. धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ६० हजार ३५२ शेतकऱ्यांना २१८ कोटी रुपये अदा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. यापैकी २१४ कोटी रुपये विमा कंपनीने दिले. परभणी जिल्ह्यातील ४ लाख २४ हजार २८० शेतकऱ्यांना १९४ कोटी ५० लाख रुपये देय होते. यापैकी १७७ कोटी ७५ लाख रुपये कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले.