लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठ्यामध्ये मोठी घट झाली असून केवळ चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक आहे. या रक्तसाठ्यात वेळीच वाढ केली नाही तर रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे मराठवाड्यात सर्वात मोठे रुग्णालय आहे. जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज या ठिकाणी उपचार घेतात. या रुग्णांवर उपचार करताना पदोपदी रक्ताची आवश्यकता भासते. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात सुरुवातीला रक्तपेढी, त्यानंतर रक्त विघटन केंद्र आणि आता मेट्रो ब्लड बँक स्थापन करण्यात आली आहे. या सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या राबविताना कुठे तरी निष्काळजीपणा होत असल्याचेच दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात किमान १ महिन्याचा रक्तसाठा उपलब्ध असणे आवश्यक असताना तो चार दिवसांपर्र्यत कमी झाला आहे. पाच महिन्यांपासून ही स्थिती निर्माण झाली आहे. एवढा रक्तसाठा कमी होईपर्यंत प्रशासनाने साठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेत रक्ताचा तुटवडा होत असेल तर हा रुग्णांच्या आरोग्याशीच खेळ होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तर हा रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे रुग्णांना रक्त हवे असल्यास एखादा नातेवाईक रक्तदानासाठी तयार करुन तातडीने रक्त उपलब्ध करुन द्यावे लागत आहे. यामध्ये विलंब झाला तर रुग्णाच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा रुग्णालयात रक्तसाठा कमी होत असताना प्रशासनाचे प्रयत्न मात्र तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. केवळ कागदोपत्री रक्तदानाचे आवाहन केले जाते. परंतु, रक्तदान शिबिरे आयोजनासाठी पुढाकार घेतला जात नाही किंवा सामाजिक संस्थांकडे तसा पाठपुरावाही कमी पडत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील हजारो रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात ही बाब लक्षात घेऊन रक्तसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:06 AM