अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे महसुली अभिलेखे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ७/१२ पाहण्याची सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या संकेतस्थळावर चार वर्षांपूर्वीचेच अभिलेखे अजूनही शेतकऱ्यांना पाहावे लागतात. हे संकेतस्थळ अद्ययावत न झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे महसुली अभिलेखे व शेतजमिनीचा झालेला खरेदी-विक्रीचा व्यवहार पाहण्याची सुविधा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर एनआयसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ७/१२ पाहण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ स्थापन करण्यात आले आहे. महसुली कायद्यानुसार राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आपल्या ७/१२ सह शेतीबाबतच्या विविध सुविधा या माध्यमातून पाहत असतात. मात्र, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे संकेतस्थळ अद्ययावत नसल्याने याचा मोठा फटका सहन करावा लागतो. तहसील कार्यालय व इतरत्र खेटे घालण्याची शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध झाली; परंतु बीड जिल्ह्यात या संकेतस्थळावर १ मार्च २०१३ पर्यंतचेच ७/१२ व शेतजमिनीच्या व्यवहारासंबंधीच्या नोंदी उपलब्ध आहेत. ४ वर्षांनंतरही महसूल प्रशासनाच्या वतीने हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात न आल्याने जिल्ह्याबाहेरील शेतकरी व किसानपुत्रांना याचा लाभ घेता येत नाही. हे संकेतस्थळ अद्ययावत करा, अशी मागणी पाटोदा येथील शेतकरी सिद्धेश्वर स्वामी यांनी एका निवेदनाद्वारे अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे केली आहे.
संकेतस्थळावर चार वर्षापूर्वीचेच अभिलेखे
By admin | Published: May 26, 2017 11:12 PM