-साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, तर काही गोष्टींची काळजी घ्याच. पोहता येत असेल तरच पाण्यात उतरा अन्यथा जिवावर बेतू शकते, हे विसरू नका.
पावसाळ्यात हौशी मंडळींनी पावसाचा, पोहण्याचा आनंद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. शहरालगतच्या परिसरात अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना सतत घडत आहेत. नदी, तलाव, हिल्स स्टेशन, वॉटरफॉल, डॅम, समुद्र किनाऱ्यावर अनेक हौशी तरुण मंडळींनी आपले प्राण गमावले आहेत. दरवर्षी गमावत असतात.
आनंदाच्याभरात योग्य ती काळजी न घेतल्याने या घटना घडतात. त्यामुळे लहान मुलं, तरुण, वयोवृद्धांनी फिरायला गेल्यावर विविध प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरून तरुण मंडळीनी जास्त जोशात येऊ नये. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांच्या खास टिप्स घेऊन आलो आहोत. यातून प्राणघाताच्या घटना टाळता याव्यात हाच उद्देश आहे.
याचे पालन करा...
-अनोळखी ठिकाणी एकट्याने जलतरण करू नये, नेहमी साथीदार सोबत असावा.
-समूहाने स्वीमिंग करताना सोबत पट्टीचे पोहणारे, जीवरक्षक सोबत असावे.
- स्वीमिंगसाठी कॅप, कॉस्ट्यूम, लाइफबॉय रिंग व फ्लोटसोबत ठेवावे.
- स्वीमिंगच्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेऊन मगच पाण्यात उतरावे.
-पोहण्याचा सराव आणि पूर्ण माहिती असल्या शिवाय फक्त मनोरंजनासाठी अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरू नये.
- स्वीमिंग करण्यापूर्वी किमान एक तास काही खाऊ नये.
- मद्यपान टाळावे.....
शो ऑफ करू नका...
- पाण्यात स्टंटबाजी करू नका.
️ कुणी सांगतंय म्हणून...
नदी, समुद्रात उडी मारायला किंवा डोंगराच्या टोकावर जाऊन उभे राहण्यासाठी कुणी जर तुम्हाला प्रेरित करत असेल आणि मोठेपणा म्हणून तुम्ही जोशात असं काही करत असाल तर सावध व्हा. पावसाळ्यात नदी पात्रात गाळ साचलेला असतो. तर समुद्रातील पाण्याचा अंदाज येत नाही. शिवाय समुद्राच्या लाटा तुम्हाला तग धरू देत नाहीत. उगाच जोशात येऊन काही करू नका. स्वीमिंग येत नसेल तर पाण्याबाहेर राहूनही तुम्ही आनंद घेऊ शकता.
-अभय देशमुख, (जलतरण प्रशिक्षक)
सेल्फीचा मोह टाळा...
डोंगराच्या सुळक्यावर, समुद्रात, वाहत्या नदीच्या कडेला सेल्फी घेण्याचा मोह या दिवसात बरा नव्हे. सेल्फीमुळे जीव जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होते आहे. वेगळा सेल्फी घेण्यासाठी तरुण मंडळी कशाचाही विचार करत नसल्याचे दिसते आहे. अशात निसर्गाशी खेळ करण्याचा मोहही टाळला पाहिजे.
-निखिल पवार (जलतरण प्रशिक्षक)
मेडिकल किट हवी....
या दिवसात पिकनिकला जाताना सोबत एक मेडिकल किट असावी. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथे काहीही होऊ शकतं. अशी ठिकाणं नागरी वसाहतीपासून जरा लांब असतात. अशावेळी काही झाल्यास वेळेवर मदत न मिळाल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक मेडिकल किटसोबत ठेवली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.