लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्राथमिक शाळा ही शाळा सिद्धीप्रमाणे ‘ए’ ग्रेडमध्ये असेल, तसेच माध्यमिक शिक्षकांच्या नववी व दहावीच्या वर्गांचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तरच अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणीचा लाभ देण्यासंबंधी जारी केलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी काही शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालक तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन सादर केले. शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांना १२ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर निवडश्रेणीचा लाभ दिला जातो. वरिष्ठ वेतनश्रेणीमुळे शिक्षकांचा ग्रेड पे वाढून पगारात जवळपास चार ते साडेचार हजार रुपयांची वाढ मिळते. मात्र, या श्रेणींसाठी पात्र झालेल्या शिक्षकांना यंदापासून नव्या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे.वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी संबंधित शिक्षणाधिका-यांना अगोदर पात्र होणा-या शिक्षकांची यादी जाहीर करावी लागणार आहे. सदरील यादीनुसार जिल्हा शैक्षणिक व्यवसाय सातत्यपूर्ण विकास संस्था आणि विद्या प्राधिकरण यांच्यामार्फ त प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण संबंधित शिक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या प्राथमिक शाळा या प्रगत शाळा व शाळा सिद्धीप्रमाणे ‘ए’ गे्रडच्या आहेत, तसेच ज्या माध्यमिक शिक्षकांच्या नववी व दहावीचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशाच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणीचा लाभ दिला जाणार आहे.
शाळा ‘ए’ ग्रेड असेल तरच, गुरुजींना श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:11 AM