औरंगाबाद : वैजापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या लासूरगाव येथील ८५ वर्षीय शेतकऱ्याला फेरफार नोंदीसाठी लिपिक २५ हजार रुपयांची लाच मागत आहे. शेतकऱ्याला २५ हजार देणे शक्य नसल्यामुळे वर्षभरापासून शेतीचा फेरफार करण्यास तलाठ्यापासून तहसीलपर्यंतची यंत्रणा छळ करीत आहे. या सगळ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. परंतु अजूनही फेरफार करण्यास तहसील कार्यालय हलत नाही. मुरलीधर शेजूळ असे शेतकऱ्याचे नाव असून, या निराश झालेल्या शेतकऱ्याने प्रशासनासमोर हात टेकले आहेत.
३० दिवसांत फेरफार मंजूर करणे बंधनकारक आहे, असे असताना शेजूळ यांच्या लासूरगाव येथील एक हेक्टर ५५ आर जमिनीचा फेर होत नाही. ५ मुलांना त्यांनी ३१ आरप्रमाणे जमीन दिली. त्याचे वाटणीपत्र वैजापूर तहसीलमध्ये दाखल केले. मात्र त्यांना वर्षभरापासून न्याय मिळत नाही. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यांना साताबारा फेरफार करण्याचे आदेश दिले. परंतु काम झाले नाही. याबाबत वैजापूर तहसीलच्या सूत्रांनी सांगितले, या प्रकरणात नेमकी अडचण काय आहे, हे जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत फेरफार का रखडला, ते सांगता येणार नाही.
कारणे दाखवा नोटीस देऊनही गती येईनाजिल्ह्यात तलाठी स्तरावर दोन हजार ३९४, तर मंडळ स्तरावर सहा हजार ३७ अशी आठ हजार ४३१ फेरफार प्रकरणे प्रलंबित आहेत. फेरफारची प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रलंबित फेरफारचा आकडा असातलाठी स्तरावर २३९४ प्रकरणे प्रलंबित आहेत. यात औरंगाबाद तालुक्यात ६६१, कन्नड तालुक्यात १७०, सोयगाव ६१, सिल्लोड ३४७, फुलंब्री १२३, खुलताबाद ५९, वैजापूर २२१, गंगापूर ३२५, पैठण ४२७, असे एकूण एकूण दोन हजार ३९४ प्रकरणांचा समावेश आहे, तर मंडळ अधिकारी स्तरावर औरंगाबादमध्ये १३४२, कन्नड ७७९, सोयगाव २७०, सिल्लोड ७५२, फुलंब्री ३१३, खुलताबाद २५४, वैजापूर ७३३, गंगापूर ७७५, पैठण तालुक्यात ६१९ फेर रखडलेले आहेत.