औरंगाबाद: कोविड महामारीत जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी अनेक रिवॉर्ड जाहीर केले; पण निधीअभावी मागील दोन वर्षात शहर आणि ग्रामीण पोलिसांना या रिवॉर्डची रोख रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोरोना महामारीमुळे निधीमध्ये कपात केल्याने हे घडल्याची माहिती सूत्राने दिली.
औरंगाबाद शहर पोलीस दलात सुमारे ३५०० तर ग्रामीणमध्ये १७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. कोविड महामारीमुळे लावलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून बंदोबस्त करीत होते. बाधित क्षेत्रातही थेट पोलीस तैनात होते. यासोबतच चोरी, घरफोडी, मंगळसूत्र चोरी, वाटमारी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांना करावा लागला. बारा बारा तास काम करताना शहर आणि ग्रामीणमधील शेकडो पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी रिवॉर्डची (बक्षीस) रक्कम त्यांना मंजूर करतात. २०१९, २०२० आणि यावर्षी विविध पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या रिवॉर्डची रक्कम अदा करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे रिवॉर्ड मिळविणारे प्रत्येक ठाण्यात आणि शाखेत मोजकेच अधिकारी, कर्मचारी असतात. त्यांना मिळणाऱ्या रिवॉर्डची नोंद त्यांच्या सेवा पटाला घेतली जाते. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, दोन वर्षात ना आम्हाला रिवॉर्डची रक्कम मिळाली, ना मंजूर रिवॉर्डची सेवापटाला नोंद झाली.
----------------
कशासाठी दिले जाते रिवॉर्ड
- खून, दरोडा, घरफोडी आणि चोरीच्या घटनेनंतर तत्काळ आरोपींना पकडून गुन्हा उघडकीस आणल्यास.
-किचकट तपास आणि जनक्षोभ असलेल्या घटनेतील आरोपींना बेड्या ठोकल्यास.
-व्ही. आय.पी.दौऱ्याचा बंदोबस्त अचूक केल्यास.
- जीव धोक्यात घालून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविल्यास
(दोन पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रतिक्रिया आहेत)