औरंगाबाद : विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभात २५ जून रोजी मेअखेरपर्यंत पीएच.डी. मिळालेल्या ४८४ संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण होणार नाही. त्यादिवशी फक्त त्यांच्या नावांचे वाचन होईल. हा समारंभ यंदा ऑनलाईन पद्धतीने होणार असला तरी, तो अविस्मरणीय व्हावा, यासाठी आपण सर्वजण सामूहिक प्रयत्न करू, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ येत्या २५ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कुलगुरूंनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन, डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, यंदा राज्यातील सर्वच विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती भगतसिंग कोश्यारी असतील. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
चौकट......
समारंभाच्या नियोजनासाठी १२ समित्यांची स्थापना
सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत सदर कार्यक्रम होईल. यावेळी पीएच.डी. संशोधकांना प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण न करता फक्त त्यांच्या नावाचे वाचन होईल. ३१ मेपर्यंत ४८४ संशोधकांनी पीएच.डी. पदवी मिळविली असून, यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे - २१६, विज्ञान व तंत्रज्ञान - १६५, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र - ५८ व आंतरविद्या शाखेच्या ४५ संशोधकांचा समावेश आहे. राजभवनच्या प्रोटोकॉलनुसार सदर सोहळा अत्यंत शिस्तबध्द व प्रोफेशनल पद्धतीने होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध १२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.