औरंगाबाद : रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश केल्यानंतर पहिल्या टप्प्यात नवीन इमारतीचे काम झाले. दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकर सुरू होणार आहे; परंतु सध्या रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. इमारतीत जागोजागी पडून असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमुळे इमारतीचा वापर कोणत्या कामासाठी होतो याची कल्पना येत आहे. या ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे; परंतु याकडे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांचा मात्र कानाडोळा होत आहे.रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आयटीडीसी ५ कोटी रुपये आणि रेल्वे ९.५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेल्या रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत मात्र वेगळी परिस्थिती आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी झालेल्या पाहणीदरम्यान रेल्वेस्थानक अधिक चकचकीत दिसून आले. अधिकाऱ्यांचा दौरा असल्यावर स्थानकाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते; परंतु अधिकारी केवळ वरवर पाहणी करीत निघून जात असल्याने जुन्या इमारतीमधील स्थितीची कल्पना कोणाला येत नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगितले.
जुन्यात मात्र दारूपार्ट्या
By admin | Published: September 11, 2014 12:43 AM