औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षाला मंगळवारपासून सुरुवात झाली. शिक्षण विभागाच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय सूचनांच्या गोंधळात उपस्थितीबद्दल दिवसभर शिक्षकांत संभ्रम होता, तर शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन शाळा स्वच्छता निर्जंतुकीकरण, व्यवस्थापन समितीच्या बैठकीच्या आयोजनात व्यस्त होते. शिक्षकांची शाळा भरली असून, पहिल्या दिवशी शिक्षणाला मात्र सुरुवात झाली नाही.
महापालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले, शहरातील मनपाच्या ७२, तर सर्व व्यवस्थापनाच्या ९७० शाळा आज उघडल्या गेल्या. शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळेचे निर्जंतुकीकरण, शाळा प्रवेश पंधरवड्याची कामे, सर्वेक्षणाची ठरवून दिलेली कामे पहिल्या दिवशी शिक्षकांनी केली. प्रत्यक्ष वर्ग भरविण्याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण म्हणाले, सीईओंच्या सूचनेनंतर रात्री उशिरा शिक्षण संचालकांच्याही सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.
सध्या शाळेत जुनी पुस्तके जमा करणे, प्रवेशप्रक्रिया, हजेरीपटाची कामे सुरू आहेत. इयत्ता दहावी आणि बारावी मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, त्या शिक्षकांना १०० टक्के, तर इतर वर्गांना ५० टक्के कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती संचालकांनी अनिवार्य केली आहे.
पुढील दोन ते चार दिवसांत ऑनलाइन वर्गासंदर्भातील तयारी करण्यात येत असून, यावर्षी अनुभव अडचणींची ओळख असल्याने त्यावर मात करून शिकविण्याची तयारी करण्यात येत असल्याचे गणोरी शाळेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख म्हणाले.
---
बारावी प्रवेशाची तयारी सुरू
ऑनलाइन पद्धतीने बारावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी काही महाविद्यालयांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कर्मचारीही नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयकसुद्धा नेमले गेले आहेत. महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची लिंक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.