औरंगाबाद : जिल्हा शिक्षक पुरस्काराकडे यंदा जि. प. शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे प्राप्त प्रस्तावांच्या आकडेवारीवरून दिसून येते. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक विभागातून ९ आणि माध्यमिक विभागातून ९ तसेच १ विशेष शिक्षक, असे एकूण १९ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यासाठी यंदा फारसे प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. प्राप्त प्रस्तावांना जि. प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी यासंबंधीची संचिका विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावर्षी राज्यस्तरीय आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षक विस्थापित झाले, तर अनेकांना दूरच्या शाळांवर पदस्थापना मिळाली. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. यातच गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी तालुकानिहाय प्रस्ताव मागितले. तेव्हा २७ आॅगस्टपर्यंत प्राथमिक विभागातून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी औरंगाबाद तालुक्यातून १, फुलंब्री तालुक्यातून १, सिल्लोड तालुक्यातून २, सोयगाव तालुक्यातून २, कन्नड तालुक्यातून १, खुलताबाद तालुक्यातून १, गंगापूर तालुक्यातून १, वैजापूर तालुक्यातून २, असे एकूण ११ प्रस्ताव प्राप्त झाले. पैठण तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. माध्यमिक जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद तालुक्यातून २, फुलंब्री तालुक्यातून १, सोयगाव तालुक्यातून १, कन्नड तालुक्यातून १, खुलताबाद तालुक्यातून २, गंगापूर तालुक्यातून २, वैजापूर तालुक्यातून १ आणि पैठण तालुक्यातून १, असे एकूण ११ प्रस्ताव प्राप्त झाले. सिल्लोड तालुक्यातून एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. विशेष शिक्षक पुरस्कारासाठी मात्र स्पर्धाच झाली नाही. यासाठी सिल्लोड तालुक्यातून एकच प्रस्ताव प्राप्त झाला असून, अन्य आठ तालुक्यांतील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी प्रस्तावच पाठविलेले नाहीत.
समारंभाची तारीख ठरेनाजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, अंतिम मान्यतेसाठी ते विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. तथापि, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी घेतला जातो; परंतु त्या दिवशी शाळांमध्येही शिक्षक दिनाचे भरगच्च कार्यक्रम असतात. त्यामुळे शिक्षक दिनी हा कार्यक्रम न घेता पुरस्कार वितरण समारंभ एकतर ४ सप्टेंबर रोजी किंवा ६ सप्टेंबर रोजी घ्यावा, असा विचार आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.