---------
५९ व्या वर्षी ९६ वे रक्तदान
५९ वर्षीय प्रवीण गंगवाल हे रक्तदानासाठी आले होते. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी आज ५९ व्या वेळेस रक्तदान केले. त्यांनी सांगितले की, १९८५ पासून मी दर तीन महिन्याला एकदा रक्तदान करत आहे. यात कोणताही खंड पडू देत नाही. मी लोकांना सांगत असतो की, रक्त काही फॅक्टरीतून निर्माण होत नाही. विशेष म्हणजे रक्तदान करून मागील २५ वर्षात मी कधीच आजारी पडलो नाही. माझे वजनही संतुलित आहे. रक्तदानाचे शतक पूर्ण करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
----
रक्तदानाच्या शतकाच्या उंबरठ्यावर
कर सल्लागार सुनील काला ५९ वर्षाचे आहेत. लोकमत आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी ९३ वे रक्तदान केले. आता रक्तदानाच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले काला यांनी सांगितले की, भगवान महावीरांनी ‘जिओ और जिने दो’ चा संदेश दिला. आपण रक्तदान करून त्याचे पालन करीत आहे. माझे नेहमी फ्रेश राहण्याचे रहस्य या रक्तदानातच असल्याचे त्यांनी नमूद केले.
----
ज्येष्ठ व मित्रांची प्रेरणाच रक्तदानासाठी ठरली पूरक
व्यावसायिक पारस गोधा यांनी सांगितले की, ज्येष्ठ व्यक्ती व मित्रांमध्ये सर्वजण नियमित रक्तदान करतात. रक्तदात्यांच्या सहवासात मी वावरत असतो. त्यांच्या प्रेरणेतून मी रक्तदान करण्यास सुरुवात केली. आज ४९ वे रक्तदान केले. रक्तदानाच्या अर्धशतकाजवळ कधी आलो हे कळलेही नाही. यामधून अनेकांचा जीव वाचला हीच माझ्यासाठी आत्मानंद देणारी बाब होय.
--------------