औरंगाबाद : कचर्यावर प्रक्रिया करणे खूप मोठे काम नाही. त्यासाठी पैसाही जास्त लागत नाही. निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून प्रत्येक वॉर्डात कचर्यावर प्रक्रिया करावी, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एका चर्चासत्रात केली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन लवकरच मनपा आणि विभागीय आयुक्तांना देण्याचे यावेळी निश्चित झाले.
स.भु. परिसरातील गोविंदभाई श्रॉफ सभागृहात सोमवारी सकाळी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, माजी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, काशीनाथ कोकाटे, नगरसेविका कीर्ती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना कामगार नेते गौतम खरात यांनी नमूद केले की, शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात तोडगा काढणे आवश्यक बनले आहे. शकुंतला देसरडा यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. मागील अनेक वर्षांपासून त्या स्वत: गांडूळ खत निर्मिती करीत आहेत. आतापर्यंत ५०० हून अधिक महिलांना या माध्यमातून रोजगार दिल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील कोणताही एक वॉर्ड दत्तक द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी सांगितले की, शहरात ४०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यातील पन्नास टक्के कचरा प्रक्रिया करण्यायोग्य असतो. शहरातील हॉटेल, केटरर्स यांनी स्वत: कचर्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार करावा. शहराच्या कचर्यावर होणारा ६० कोटींचा खर्च कमी होईल. नेहमी उद्योजकांनी मदत करावी, अशी मागणी होते. आता लोकसहभागातून महापालिकेने काही प्रक्रिया करणार्या मशीन उभाराव्यात. उर्वरित मशीन शहरातील सर्व उद्योजक देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. भालचंद्र कांगो यांनी कचरा अडवा कचरा जिरवा ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी मनपा कर्मचारी, अधिकार्यांना स्वत:चा कचरा घरातल्या घरातच जिरवा, अशी सक्ती करा, असे नमूद केले. नगरसेविका शिंदे यांनी कचर्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला. सूत्रसंचालन माजी नगरसेवक गौतम लांडगे यांनी केले.
आमचे हातावर हात नाही...मागील १८ दिवसांमध्ये मनपा प्रशासन आणि पदाधिकार्यांनी कचर्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या हे जनतेला माहिती आहे. आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही. मागील चार महिने मी सफाईसाठी जे परिश्रम घेतले त्यावर पाणी फेरल्या गेले. प्रक्रिया करण्यासाठी शासनाला डीपीआर दिला आहे, नारेगावकरांची माफी मागितली, पाया पडलो...आणखी काय करावे...? आणीबाणीअंतर्गत मशीन खरेदीचा विचारही सुरूअसल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले.
टक्केवारी मागू नका हो...माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. उद्या कचर्याची मशीन बसविणे सुरू केले, तर पन्नास इतर कंपन्या येतात. ते टक्केवारी वाढवितात. मग होणारे कामही होत नाही. शहरासाठी काहीतरी चांगले काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
केंद्रीय पथकाच्या एका सदस्याचे आगमनस्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने नेमलेल्या एका खाजगी कंपनीचे सर्वेक्षक सोमवारी शहरात दाखल झाले. मुकुंद पाटील यांना औरंगाबाद महापालिकेतील कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम शासनाने सोपविले आहे, शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी वेगळी टीम दाखल होणार आहे. पाटील यांनी सोमवारी दिवसभर महापालिकेत बसून विविध फायलींची तपासणी केली. किमान दोन-तीन दिवस हे काम चालणार आहे. कागदोपत्री कारवाईसाठी चारहजारपैकी १८०० गुण आहेत. १२०० गुण स्वच्छतेच्या पाहणीसाठी, एक हजार गुण स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी आहेत. ज्याला सिटीझन फिडबॅकही म्हणतात.
विरोधामुळे मनपाची तलवार म्यानमागील तीन-चार दिवसांपासून महापालिका शहराच्या परिसरातील विविध मोकळ्या जागांवर कचरा टाकत होती. प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा विरोध, रोषाला बळी पडावे लागत आहे. सोमवारी महापालिकेने कचर्याचे एकही वाहन शहराबाहेर नेले नाही. सर्व वाहने कचर्यासह मध्यवर्ती जकात नाका येथे उभी आहेत. सोमवारी जुन्या शहरातील अनेक वसाहतींमधील काहीअंशी कचरा उचलण्यात आला. हा कचरा कोठे नेऊन टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावत आहे.
कचराप्रश्नी आज लोकप्रतिनिधींची बैठकमागील १८ दिवसांपासून शहरात कचर्याची कोंडी सुरू आहे. या प्रकरणात सोमवारी खंडपीठाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता महापौर बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कचरा प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. कचरा कोंडीसंदर्भात खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, सोमवारी सुनावणीप्रसंगी न्यायालयाने शहरातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मतही जाणून घ्यावे, असे नमूद केले. त्यावरून मंगळवारी दुपारी १ वाजता सर्व आमदार, जिल्ह्याचे खासदार, माजी महापौर, मनपा पदाधिकारी, गटनेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.