औरंगाबाद : घाटी रुग्णालय हे ट्रॅशेरी केअर आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर स्वीकार करण्यासारखा आहे. मात्र, याठिकाणी ग्रामीण भागातून, अन्य जिल्ह्यांतून रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. कोणत्याही रुग्णाला रेफर करण्यापूर्वी त्याला ऑक्सिजन, इंजेक्शन, सलाइन दिले पाहिजे. आला रुग्ण, की रुग्णवाहिकेतून सरळ रेफर करा, हा प्रकार थांबला पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांनी योग्य पाऊल उचलण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शनिवारी घाटी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. ज्योती इरावणे- बजाज आदी उपस्थित होते. पथकाने घाटीत कोरोनाग्रस्तांसाठी किती खाटा आहेत, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड आहेत, याची माहिती घेतली. ऑक्सिजच्या व्यवस्थेचाही आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेचीही माहिती घेतली. या सोयी-सुविधांविषयी पथकाने समाधान व्यक्त केले. घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या (व्हीआरडीएल) कामाचेही पथकाने कौतुक केले; परंतु घाटीत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून रेफर होणाऱ्या रुग्णांविषयी पथकाने चिंता व्यक्त केली. तालुका पातळीवरील रुग्णांना प्राथमिक उपचार दिल्यानंतरच रेफर करण्याची गरज आहे. त्यासाठी काही तरी करावे, अशी सूचना पथकाने केली. यापूर्वी घाटीने ग्रामीण भागात प्रशिक्षण दिल्याची माहिती पथकाला देण्यात आली.
१० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन मिळावा
ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्रात, रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्याची तातडीने पूर्तता केली पाहिजे. एखाद्या रुग्णाला रेफर करायचे असेल, तर त्यापूर्वी किमान २ तास १० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन दिला पाहिजे. त्यानंतर रुग्ण रेफर करावा, असे सांगण्यात आले.
फोटो ओळ
घाटीत शनिवारी केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यावेळी उपस्थितीत घाटीतील डॉक्टर्स.