औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.
घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु एप्रिल महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा असल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.
सध्या महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे आणि रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर होत आहे. रक्त, रक्तघटकाची मागणी अधिक आणि साठा कमी अशी अवस्था झाली आहे. अनेक रुग्णांची खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते.
परिणामी गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठीच रक्त उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अॅनेमियासह अनेक आजारांच्या रुग्णांना रक्तासाठी वेटिंगवर ठेवले जात आहे. या रुग्णांना पाच ते सहा दिवस उशिरा रक्त दिले तरी चालते, असे विभागीय रक्तपेढीतील सूत्रांनी म्हटले.