लासुर स्टेशन : मागील महिन्यात कांद्याची आवक नसल्याने साडेतीन हजार रुपये प्रती क्विंटल कांद्याला भाव मिळत होता. मात्र, मार्च महिन्यात उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच, कांद्याच्या किमती घसरल्या आहेत. आता १,५०० ते १,६०० रुपये प्रती क्विंटल कांद्याला भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांचे १,८०० ते २,००० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासूर स्टेशनला ओळखले जाते. जिल्ह्यातील विविध भागांतून कांदा विक्रीसाठी येथे येतात. गेल्या महिन्यात कांदा सात ते आठ वेळा भरलेल्या बाजारामध्ये १,५३६ गोणी कांद्याची आवक झाली, तर मार्च महिन्यात आतापर्यंत चार वेळा भरलेल्या बाजारात ३,२३८ गोण्यांची आवक झाली आहे. त्यात भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मात्र, मागील वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने, शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लागवडीवर भर दिला आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, शेती मालाला मातीमोल भाव मिळत असल्याने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
लाल कांद्याचे उत्पन्न घटल्याने मागील महिन्यात जेमतेम लाल कांदा बाजारात येत होता, तर लाल कांद्याला साडेतीन हजारांपर्यंत भाव मिळत होता, तर मार्च महिन्यात उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच, १,८०० ते २,००० हजार रुपये कांद्याचा भाव घसरला आहे. पुढील महिन्यात आणखीनच भाव घसरतो की काय, अशी चिंता शेतकरी करीत आहेत. सरकारने कांद्याला हमी भाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
----------
१७ फेब्रुवारी २०२१ : १३८ गोणी आवक :
सर्वात जास्त भाव : ३,५०० रुपये प्रती क्विंटल.
कमीतकमी भाव : ६५० रुपये प्रती क्विंटल.
सरासरी भाव : २,७०० रुपये प्रती क्विंटल.
-----
१४ मार्च २०२१ : ३,२३८ गोण्याची आवक.
जास्तीतजास्त भाव : १६०० रुपये प्रती क्विंटल.
कमीत कमी भाव : २०० रुपये प्रती क्विंटल.
सरासरी भाव : १३२५ रुपये प्रती क्विंटल.