घाटीत अडीच हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
औरंगाबाद : घाटीत गेल्या ९ महिन्यांत उपचार घेऊन अडीच हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त झाले. मार्च २०१९ पासून आतापर्यंत २ हजार ६८० कोरोना रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले. घाटीत दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते.
अधिष्ठातांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या ६१ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची सोमवारी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. उपोषण थांबविण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
ऑनलाईन अर्ज करताना वाहनधारकांना मनस्ताप
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात सर्वच कामकाज ऑनलाईन झालेले आहे. शिकाऊ परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना एडीटची सोय नसल्याने अर्ज चुकला की, केवळ मनस्तापच मिळत आहे. पुन्हा शुल्क भरून दुसरा अर्ज करावा लागत असल्याने भुर्दंड सहन करावा लागत आहे. अर्ज भरताना अनेक वाहनधारकांकडून पत्ता लिहिताना चुका होतात, कधी स्पेलिंग चुकते, तर कधी नावात चूक होते किंवा इतर माहिती भरताना शब्द विसरले जातात. असा अर्ज सबमिट केला तर तो पुन्हा एडीट करण्याची सोय नाही. त्यामुळे वाहनधारकाला दुसरा अर्ज भरावा लागतो, त्यावेळी पहिले शुल्क वाया जाते.
सचखंड एक्स्प्रेस आज पुन्हा अंशत: रद्द
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे १२ जानेवारी रोजी पुन्हा एकदा नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस न्यू दिल्ली ते अमृतसरदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे न्यू दिल्लीपर्यंतच धावेल, तर अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस १४ जानेवारी रोजी अमृतसर-न्यू दिल्लीदरम्यान अशंत: रद्द करण्यात आली आहे. यादिवशी ही रेल्वे न्यू दिल्लीवरूनच धावणार आहे.