औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या राज्यस्तरीय औषध भांडार (मेडिकल हब) आणि प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करण्यासाठी ३० कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रक आणि आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे करमाड येथे औषध भांडार उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
औषधी खरेदीत मोठा घोळ होत असतो. ठराविक लोकांना कंत्राट मिळते. मागणीपेक्षा अधिक पुरवठा केला जातो. शिवाय आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे वेगवेगळी औषध खरेदी प्रक्रिया होत होती. त्यात होणारे घोटाळे आणि वेगवेगळी खरेदी टाळण्यावर भर देण्यात आला. राज्यभरात सध्या ‘हाफकिन’कडून औषधी खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे उभारण्यात येणारे राज्यस्तरीय औषध भांडार गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु या औषध भांडाराची नियोजनाप्रमाणे उभारणी होणार आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी जूनमध्ये ‘लोकमत’ला दिली होती. २०१० मध्ये औषध भांडार उभारण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बांधकामासाठी अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यस्तरीय औषध भांडार व प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक आणि आराखडे केंद्र शासनाच्या ‘आयपीएचएस’ स्टँडर्ड मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून तयार करण्यात आले आहेत.राज्याच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी त्यास मान्यता दिली. शासन निर्णयाद्वारे ५ सप्टेंबर रोजी बांधकामासाठी ३० कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
ग्रामपंचायतीने दिली १३ एकर जमीनऔषध भांडारासाठी करमाड ग्रामपंचायतीने १३ एकर जमीन दिलेली आहे. पोलिओ व्हॅक्सीन स्टोअर, सलाईन स्टोअरसह विविध औषधांना लागणाऱ्या तापमानानुसार चार औषध भांडार कक्षांचे नियोजन करण्यात आले. पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा पुरवठा कमीत कमी वेळेत करणे महत्त्वाचे ठरते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या एका एकरमध्ये हेलिपॅड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘डीएमआयसी‘ प्रकल्पामुळे औषध कंपन्या येतील. त्यामुळे ज्यावेळी क मी किमतीत औषध उपलब्ध होतील, त्यांची साठवणूक करण्याच्या दृष्टीने भांडार महत्त्वाचे ठरेल.