औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारपासून सृजन रंगमंचावर सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांच्या हस्ते होईल. यात रविवार ते बुधवारपर्यंत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहायला मिळणार आहे.
विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव प्रत्येक वर्षी घेण्यात येतो. मागील वर्षी हा युवक महोत्सव तुळजापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला होता. यावर्षी महोत्सव विद्यापीठ परिसरातच होत आहे. महोत्सव ऐन दिवाळीच्या सुट्टयांमध्येच आयोजित केल्यामुळे पुरेसा वातावरण निर्मिती झालेली नाही. अनेक विद्यार्थी अद्यापही गावाहून परतलेले नाहीत. यामुळे महोत्सवला एक दिवस उरला असतानाच केवळ विद्यार्थी कल्याण संचालक विभागातच तयारीची धामधुम सुरू होती.
या महोत्सवात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचा-यांनी यावेळी अलिप्त राहणेच पसंत केले आहे. केवळ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची मित्रमंडळी महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रयत्न करत आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोनशे पेक्षा अधिक महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी किती संघ प्रत्यक्ष सहभागी होतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सात रंगमंचावर सादर होणार कलाप्रकारप्रत्येक वर्षी युवक महोत्स्वासाठी सोनेरी महालाच्या बाजूला मुख्य रंगमंच उभारण्यात येत असतो. मात्र यावर्षी नाट्यशास्त्र विभागात असलेल्या छोटेखानी ठिकाणी सृजनरंग हा मुख्य रंगमंच उभारण्यात आला आहे. याशिवाय लोकरंग हा दुस-या क्रमांकाचा रंगमंच खो-खो मैदानावर उभारला आहे. विद्यापीठ नाट्यगृहात नाटयरंग हे तीस-या क्रमांकाचे रंगमंच असणार आहे. नटरंग हा चौथ्या क्रमांकाचा रंगमंच अॅकडमिक स्टाफ कॉलेज गेस्ट हाऊस समोर उभारला आहे. तर कमवा व शिका योजना मध्ये ललितरंग हा पाचवा रंगमंच असणार आहे. प्राणिशास्त्र विभागात शब्दरंग हा सहावा आणि सीएफसी सभागृहात नादरंग हा सातवा रंगमंच असणार आहे.
जेवण कंत्राटाचा शेवटपर्यंत गोंधळ विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातुन येणा-या २ हजार कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. मात्र या सर्वांना नाष्टा, चहासह दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र केवळ दोनच निविदा आल्या. यातही या दोन्ही निविदा एकाच व्यक्तीने टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुलगुरूंनी विश्रामगृहातील खानावळ चालकाला कलाकारांचे जेवण बनविण्याचे आदेश दिले. मात्र काही विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत त्याच निविदाधारकांना कंत्राट देण्यास भाग पाडल्याचे समजते.