‘एजी’चा आक्षेप : आयुक्तांची विचारणा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेने केंद्राच्या १३ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून अनुज्ञेय नसलेली कामे केल्याचा गंभीर आक्षेप भारताच्या महालेखाकार तथा नियंत्रकांनी घेतला आहे. याअनुषंगाने आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेला त्याबाबत विचारणा केली आहे.मे व जून या दोन महिन्यात ‘एजी’ (महालेखाकार) कार्यालयाकडून महापालिकेचे २०१४-१५,२०१५-१६ व २०१६-१७ या तीन आर्थिक वर्षांचे संपूर्ण लेखापरीक्षण करण्यात आले. दोन महिन्यांत या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिकेतील विविध विभागांची झाडाझडती घेतली. ३० जुनला हे लेखापरीक्षण संपुष्टात आले. भारताच्या महालेखाकार तथा नियंत्रकांनी अमरावती महापालिकेच्या गेल्या तीन वर्षांतील उत्पन्न व खर्चाच्या बाबीचे लेखापरीक्षण केले असता मागील कालावधीत १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अनुज्ञेय नसलेली कामे घेण्यात आली आहेत, असे निरीक्षण वजा आक्षेप त्यांनी नोंदविला. या अनुषंगाने या निधीतून कोणती कामे घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात कोणती कामे घेतलेली आहेत, याची आपण शहानिशा करावी व जी कामे अनुज्ञेय नसताना घेण्यात आली, अशा कामांची यादी पुढील सात दिवसांत आपल्याकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी शहर अभियंत्यासह उभय कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. ५ मे पासून या लेखापरीक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. महापालिकेतील बहुतांश विभागप्रमुखांनी या लेखापरीक्षणाचा धसका घेतला होता. आॅडिटवर आॅब्जेक्शन येऊ नये, यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी धावपळ करून आक्षेप येण्यापुर्वीच अनुपालन करण्याचा प्रयत्न चालविला होता.
पोलीस दलातर्फे आॅपरेशन मुस्कान
By admin | Published: July 02, 2017 12:14 AM