पैठण : पूर्वीच्या काळात काम जास्त असल्यामुळे महिला लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफूचा बोंड घशाला लावायच्या. त्यामुळे मुले झोपी जात होती. मात्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अफूची जागा मोबाइलने घेतली असून, मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत. मोबाइलला मुलांपासून दूर ठेवा, असे आवाहन समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी शुक्रवारी येथे आयोजित बालसाहित्य संमेलनात केले.
पैठण येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता माहेश्वरी धर्मशाळा येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन समाजसेवक दीपक नागरगोजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत, मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले, डॉ. दादा गोरे, किरण सगर, पुंडलिक अतकरे, साहित्यिक बाबा भांड, मसापचे सचिव संतोष गव्हाणे, स्वागताध्यक्ष संतोष तांबे, डॉ. उर्मिला चाकूरकर, मसापचे अध्यक्ष अनिल देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीराम केदार, प्रकाश लोखंडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सोमनाथ परदेशी, किशोर तावरे, चेअरमन राजेंद्र वाघमोडे, प्रा. संदीप काळे, प्राचार्य रामावत, भास्कर बडे, बालसाहित्यिक आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. साहित्य संमेलनात परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते. येथे आलेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पुस्तकांची खरेदी केली. या संमेलनासाठी पैठण शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.
बालसाहित्याच्या माध्यमातून मुलावर मूल्यसंस्कार घडतील : सावंतयावेळी मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सुरेश सावंत म्हणाले की, आजच्या बालगोपाळांच्या आयुष्यातील संवाद हरवला आहे. गोष्ट हरवली. कविता हरवली. हे सगळेच मान्य करतात; पण त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. शाळा नावाच्या उद्यानाची वाळवंटाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांवर मूल्यसंस्कार घडतील; अन्यथा यंत्राच्या युगात मुले यंत्र बनतील. यासाठी खबरदारी घेऊन बालकांच्या हातात पुस्तक दिल्यास उत्तम मूल्यसंस्कार घडतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित जवळजवळ सर्वच घटकांमध्ये एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या जोडीने आमच्या मनात, मेंदूत आणि हृदयात निष्क्रियतेचा व्हायरस शिरला आहे. कोरोना कालखंडातील बंदीमुळे लक्षावधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दोन अनमोल शैक्षणिक वर्षे वाया गेली आहेत. हे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरणार, हा प्रश्न आहे. आजचे शिक्षण पोथीनिष्ठ बनले आहे. उपाययोजनेच्या पातळीवर त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही, अशी खंत यावेळी डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.