फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या नजीक एका कारमधून २१ लाखाचे अफू स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री जप्त केले. आज, बुधवारी पहाटे ४ वाजता फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान राज्यातील एकास अटक केले आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस छत्रपती संभाजीनगरहून निघालेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अफूची तस्करी होत असल्याची गुप्तवार्ता मिळाली होती. यावरुन पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपोनि पी.पी. इंगळे यांनी पथकासह छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवारी रात्री नाकेबंदी केली. मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या एका कारला ( एमएच २१ बीएच ५९७७) पोलिसांनी थांबवले. नायब तहसीलदार संजीव राऊत आणि शासकिय पंचासमक्ष कारची तपासणी केली असता कारमधील सहा गोण्यात अफूची बोंडे आढळून आली. याबाबत सहायक रासायनिक विश्लेषक शीतल मालकर, प्रकाश लव्हाळे, प्रयोग शाळा परिचर कथु नकटधागावीत यांनी तपासणी करून सर्व बोंडे अफूची असल्याची खात्री केली.
या प्रकरणी पोलिसांनी ओमप्रकाश भागीरथराम बिष्णोई ( २४, रा.नगर ता.गुडामालानी जि. बाडमेर राज्य राजस्थान) यास अटक केली आहे. तसेच ६ गोण्यामधील २१ लाख रुपये किंमतीचे ८७ किलो १०० ग्राम वजनाचे अफू, कार आणि मोबाईल असा एकूण ३१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड ,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ,सपोनि पवन इंगळे, सपोनि सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक दगडू जाधव , लहु थोटे,भागीनाथ वाघ, नामदेव सिरसाठ, संतोष पाटील, सुनिल खरात, श्रीमंत भालेराव, विठ्ठल डोके, वाल्मीकं निकम, गोपाल पाटील, अंगत तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, आनंत घाटेश्वर यांनी केली.