औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. निवडणुका संपल्या की ते मैदानातून गायब होतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना कसलीही जाण नसते, अशा संधिसाधू नेत्यांना समाजानेच हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केली.
ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मनपा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबादसह मराठवाडाभर पक्ष बांधणीसाठी दौरा आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. मनपाच्या २५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असून, उर्वरित २५ जागांवर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार आहोत. गेली २५ वर्षे सत्ताधारी पक्षाने शहरातील गटार, रस्ते, पाणी प्रश्नाला बगल दिली आहे. शहरातील खड्डे सहन करीत पुन्हा त्याच पक्षाला निवडून दिले जाते. विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष निवडणूक लढणार आहे.
मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकारे एकमेकांची जबाबदारी ढकलत आहेत. कोविडचा धाक दाखवून सरकार वेळकाढू धोरण राबवीत आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही खाजगी शाळांच्या फीसंदर्भात दादागिरी कायम आहे. कोविड काळानंतर पालक अडचणीत आहेत. त्याचा विचार केला जात नाही. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांचे शाळा, कॉलेज सुरूच केले पाहिजे. शैक्षणिक नुकसानीवर कुणी बोलत नाही. मंदिर उघडले पाहिजे, या भूमिकेतून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. शैक्षणिक पिढ्या बरबाद होत आहेत. शेतकऱ्यांना खाईत लोटणारे कायदे रद्द करा, यासाठी पक्षाची आंदोलनाची भूमिका कायम आहे, असे ॲड. सुरेश माने यांनी जाहीर केले.
यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.