वाळूज महानगर : घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विटावा येथे खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
विटावा गावातील शिवाजीनगर या वसाहतीत रस्त्यालगतच मोबाईल टावर उभारण्याचे काम सुरु केले आहे. विशेष म्हणजे टॉवर उभारण्यात येणाऱ्या ठिकाणावरुन उच्च दाबाची वीजवाहिनी गेली असून, त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची भिती वर्तविली जात आहे. रस्त्यालगत टावर उभारले जात असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीकडून संबंधित खाजगी कंपनीला टॉवर उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण आहे.
या वसाहतीत मोबाईल टावर उभारण्याचे काम बंद करुन नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, यासाठी त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर योगेश मुदीराज, गणेश गवारे, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्र्य सातपुते, सुनिल बोचरे, नंदा दांडेकर, पुष्पा मोहिते, भाग्यश्री नागरे,त्रिंबक दांडेकर, बद्रीनाथ इंगळे, सुरेखा मिसाळ, अरुण मिसाळ आदींच्या स्वाक्षºया आहेत.