लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिकेच्या मागील सभेचा कार्यवृत्तांत रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी विरोधी पक्षातील सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला दिलेले पत्र सभागृहात वाचून दाखविण्याची जोरदार मागणी केली. मात्र, ऐनवेळी आलेल्या पत्राबाबत कायदेशीर सल्ला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळवू, असा खुलासा नगराध्यक्षांनी केला. यावर समाधान न झालेल्या भाजप-सेनेच्या सर्व सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या सुरूवातीलाच भाजपचे भास्कर दानवे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला दिलेले पत्र सभागृहासमोर वाचून दाखविण्याची मागणी केली. यास सभापती महावीर ढक्का यांनी आक्षेप घेतला. २७ फेबु्रवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेच्या नोंदवहीत विरोधी पक्षातील सदस्यांनी स्वाक्षऱ्या न केल्यामुळे ते सभागृहात कायदेशीर उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सभेच्या कार्यवृत्तांत घेतले नसल्याचे सांगितले. यावर सदस्य विष्णू पाचफुले, बाला परदेशी, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर ढोबळे, अशोक पांगारकर यांनी विरोध दर्शवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पालिकेला कायदेशीर कार्यवाहीला समोरे जावे लागेल, अशी भूमिका विरोधी सदस्यांनी मांडली. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र सभागृहात वाचून दाखविण्याचा प्रयत्न केला, मात्र विषयपत्रिकेवर चर्चा करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी काही गोंधळ घातला. जगदीश भरतिया यांनी शहरातील संथ गतीने सुरू असलेल्या रस्ते कामाचा मुद्दा उपस्थित केला. रमजान सुरू असलेल्यामुळे शहरातील पथदिवे एक महिन्यासाठी सुरू करावेत, अशी मागणी शहाआलम खान यांनी केली. मोतीतलाव व मुक्तेश्वर तलावांतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा. जीर्ण झालेल्या लोखंडी पुलाबाबत निर्णय घ्यावा याकडे संध्या देठे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पाणीपुरवठा सभापती आरेफ खॉ , रफिया बेगम, नजीब लोहार, शेख शफीक, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे, अमीर पाशा, विजय चौधरी यांनी सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला.
सर्वसाधारण सभेवर विरोधकांचा बहिष्कार
By admin | Published: May 30, 2017 11:46 PM