लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणाच्याआंदोलनात सहभागी तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सहा कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी पुंडलिकनगर येथील जलकुंभावर चढून आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलक जलकुंभावरून खाली उतरले. आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव जलकुंभाजवळ जमा झाले होते.मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदविले. यात बहुतांश बेरोजगार तरुणांची संख्या अधिक आहे. यामुळे त्यांची नोकरीची संधी हुकू शकते, ही बाब लक्षात घेऊन मराठा समाजाच्या वतीने हे सर्व गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सहा ते सात कार्यकर्ते शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर येथील मनपाच्या जलकुंभावर चढले. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी जलकुंभावर चढताना सोबत रॉकेलच्या बाटल्या नेल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली.पोलिसांनी जलकुंभावर येण्याचा प्रयत्न केल्यास वरून उड्या मारण्याचा, अथवा जाळून घेण्याचा इशारा कार्यकर्ते पोलिसांना देत होते. सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक एल. ए. सिनगारे, प्रेमसागर चंद्रमोरे, नाथा जाधव, प्रल्हाद जाधव, मधुकर सावंत, अनिल गायकवाड, दादासाहेब सिनगारे, भारत काकडे फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. शीघ्र कृती दल, अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी उपस्थित होते. आंदोलक जलकुंभावरून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत होते. शिवाय कोणालाही ते जलकुंभावर येऊ देत नव्हते. यामुळे पोलिसांनी संयमाची भूमिका घेत माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांना जलकुंभावर पाठविले. देशमुख यांनी जलकुंभावर जाऊन आंदोलकांच्या मागणीची चिठ्ठी वरून खाली फेकली. यात आंदोलकांनी गुन्हे परत घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी येथे येऊन पत्र द्यावे आणि त्यांना बोलण्यासाठी माईकची मागणी केली. पोलिसांनी ही बाब वरिष्ठांमार्फत जिल्हाधिकाºयांना कळविली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार रमेश मुनलोड आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांसोबत फोनवर चर्चा केली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी एका अधिकाºयामार्फत आंदोलकांच्या मागणीनुसार कार्यवाही करणारे पत्र पाठविल्याने आंदोलक साडेतीन तासांनंतर जलकुंभावरून खाली उतरले.घोषणांनी दणाणला परिसरमराठा समाजाच्या मागण्यांसाठी काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत असल्याचे कळताच हजारो मराठा बांधवांनी तेथे धाव घेतली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ, जय शिवराय, अशा घोषणा देत त्यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला. आंदोलकांनी जलकुंभासमोरील रस्त्यावरच ठिय्या दिला होता. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पोलिसांना बंद करावा लागला. मराठा समाजाच्या या घोषणांनी पुंडलिकनगर परिसर दणाणला.यांनी केले आंदोलनजलकुंभावर चढून आंदोलन करणाºयांमध्ये संतोष काळे पाटील, रमेश गायकवाड, संजय सोमवंशी, विशाल पवार, अशोक मोरे, अशोक वाघ, रमेश सहाने आणि सचिन मिसाळ यांचा समावेश होता. आंदोलक जलकुंभावरून उडी मारण्याचा प्रयत्न करीत असे तेव्हा खाली उपस्थित असलेले समाजबांधव त्यांना हात जोडून हे असे करू नका म्हणून सांगत होते.सहायक पोलीस आयुक्त डॉ. कोडे, पोलीस निरीक्षक सिनगारे यांनीही माईकवरून त्यांना आवाहन करताना मागण्या शासनापर्यंत पोहोचवितो, तुम्ही कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, खाली या, असे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपविभागीय अधिकाºयांनी आणलेले पत्र जलकुंभावर नेऊन दिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना खाली आणले.
औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जलकुंभावर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:04 AM
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी मराठा ...
ठळक मुद्देसाडेतीन तास : गुन्हे मागे घेण्याचे पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे