खुलताबाद : खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलीन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी जो घाट घातला आहे तो यशस्वी होऊ देणार नाही. त्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी रविवारी खुलताबाद विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला उत्पन्नाचे स्रोत नसल्याने बाजार समितीची निवडणूकही होऊ शकली नाही. बाजार समितीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनही लवकर होत नसल्याने समितीतील कर्मचाऱ्यांनी सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समिती ही औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत विलीन करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे खुलताबाद तालुक्यात प्रचंड रोष निर्माण झाला असून खुलताबाद बाजार समितीचे स्वतंत्र अस्तित्व राहावे, या संदर्भात सोमवारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. प्रशांत बंब यांनी भ्रमणध्वनीवरून पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खुलताबाद बाजार समिती औरंगाबाद बाजार समितीत विलीनीकरण करण्यासाठी जो घाट घातला जात आहे, तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांवरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यासाठीच दि. ५ रोजी बाजार समितीचे माजी संचालक व शेतकरी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
या पत्रकार परिषदेस पं.स. सभापती गणेश आधाने, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी सभापती दिनेश अंभोरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी नगरसेवक अशिष कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.