औरंगाबाद : ‘मिक्सोपॅथी’च्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) औरंगाबाद शाखेतर्फे मंगळवारी समर्थनगर येथील आयएमए सभागृहासमाेर जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने करण्यात आली. आयुर्वेदिक डॉक्टरांना नव्हे, तर ‘मिक्सोपॅथी’ला विरोध असल्याचे यावेळी ‘आयएमए’ने म्हटले आहे.
निदर्शनात अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, उपाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. जीवन राजपूत, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. उज्ज्वला झंवर, डॉ. ईश्वरचंद्र नागरे, डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ. संदीप अंबेकर, डॉ. बालाजी गुंगेवाड, डॉ. अरुण अडचित्रे, डॉ. मनीष मालानी, डॉ. अमित कोठारी, डॉ. संजय देवरे आदी सामील झाले होते. यावेळी ‘मिक्सोपॅथी मुर्दाबाद... सीसीआयएम नोटीफिकेशन वापस घ्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. निदर्शनापूर्वी आयएमए सभागृहात बैठक झाली. याप्रसंगी डॉ. संतोष रंजलकर, डॉ. यशवंत गाडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गाडे म्हणाले, कोविडच्या नावाखाली ॲलोपॅथी डॉक्टरांचा वापर करण्यात आला. कोविड कमी होताच त्यांच्याविरुद्ध कायदे आणले जात आहेत. मिक्सोपॅथीमुळे ग्रामीण भागातील रुग्ण सर्वाधिक भरडले जातील.
ॲलोपॅथीला संपविण्याचे कारस्थान
आयुर्वेदातील पदव्युत्तरांना ५८ शस्त्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ॲलोपॅथीचे डॉक्टर मॉडर्न मेडिसिनला प्राधान्य देतात. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या वेगवेगळ्या आहेत; परंतु ॲलोपॅथीला संपविण्याचे कारस्थान केले जात आहे. याविरुद्ध लढा दिला जाईल, असे डॉ. संतोष रंजलकर म्हणाले.
फोटो ओळ...
‘मिक्सोपॅथी’च्या विरोधात निदर्शने करताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि डॉक्टर.