छत्रपती संभाजीनगर : ज्यांचा शिक्षणाशी गंधही नव्हता, अशा व्यक्तींची नावे शिक्षण संस्थांना बिनबोभाटपणे देण्यात येत होती. त्या काळात जगभर नावाजलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध झाला. नुसता विरोधच नाही तर तब्बल १७ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाला. ही खेदाचीच बाब असल्याचे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३०वा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे यांचे ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. व्यासपीठावर कुलसचिव दिलीप भरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता हाेके पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गव्हाणे म्हणाले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतीक आहे. वास्तविक बाबासाहेब हे सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रणेते होते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. मराठवाड्यात पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळे अनेक बहुजन समाजातील पिढ्या शिकू शकल्या. अशा महामानवाचे नाव मिळणे, हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले.
सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन व्हावेअध्यक्षीय समोरापात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन केले पाहिजे. त्या काळात मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी बोलून दाखवली. त्यांचे नाव मिळाल्यामुळे विद्यापीठाचाच गौरव झाला असल्याचेही डॉ. गोसावी यांनी सांगितले. यावेळी नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.