औरंगाबाद : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केल्यामुळे राज्यात खा. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र, ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला विरोध करणे आणि सोशल मीडियातील प्रकरणी यू- टर्न घेतला. खा. मुंडे यांचा विरोध राष्ट्रवादीतील व्यक्तीसापेक्ष नव्हता. तो वृत्तीसापेक्ष होता, असे घूमजाव करणारे उत्तरही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ग्रामीण महिला बचत गटाच्या सिद्धा प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. १२ नोव्हेंबरच्या विधानसभेत बहुमत प्रकरणात उडालेल्या गोंधळानंतर पहिल्यांदाच मुंडे यांनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करणे ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही असे मतदान झाले आहे. जे विरोधक होते, त्यांनी प्रक्रियेनंतर गदारोळ केला. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन प्रगल्भता दाखविली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते खा. मुंडे यांच्या विरोधात होते. मग आता आपण राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये आहात, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर बाबांचे संस्कार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे खा. मुंडे यांच्याप्रमाणेच राज्य सांभाळतील. विकासात आड येणाऱ्यांना भाजपा सोडणार नाही. खा. मुंडे यांनी पूर्ण आयुष्य राष्ट्रवादीचा विरोध पत्कारला, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीसोबत आहे, असे मुळीच म्हणणार नाही. भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता. मुंडे यांची व्यक्तीसापेक्षऐवजी वृत्तीसापेक्ष अशी लढाई होती. संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी विरोधी प्रचार आपण केलात, मग आता तर पाठिंबा त्यांचाच आहे. यावर त्या म्हणाल्या की, संषर्घ यात्रेत खा. मुंडे आणि राष्ट्रवादी विरोध असा प्रचार केला नाही. भाजपाने जनतेला धोका दिलेला नाही. स्थिर सरकार भाजपाने दिले आहे. राष्ट्रवादीऐवजी सेनेचा पाठिंबा घेता आला असता असे पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या त्यांनाही तो देता आला असता.तटकरे, पवार यांच्या चौकशीचे काय?खा. मुंडे म्हणाले होते, राज्यात सत्ता आल्यानंतर सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकील. राष्ट्रवादीने तर भाजपाला पाठिंबाच दिला आहे, तटकरे, पवारांच्या चौकशीचे काय होणार, यावर त्या म्हणाल्या, चौकशी केली जाईल. जे दोषी असतील ते तुरुंगात जातील.
शरद पवारांऐवजी वृत्तीला होता विरोध
By admin | Published: November 14, 2014 12:46 AM