लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अभूतपूर्व पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या लातूर शहराला अद्यापी आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे़ मनपाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा पाणी देण्याचे वचन अनेकदा दिले़ मात्र यंत्रणा कार्यरत होऊ शकली नाही़ गेल्या ४ मे पासून तर मांजरा प्रकल्पावरील दोन पंपांपैकी एक पंप बंद आहे़ त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे़ नूतन महापौर सुरेश पवार यांनी विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शनिवारी सकाळी नागझरी गाठून तेथील पंप सुरू केला़ मात्र टाकळीच्या शेतकऱ्यांनी हा पंप बंद करून लातूरला पाणी देण्यास विरोध केला़ दरम्यान, महापौरांनी गावकऱ्यांची समजूत घातल्यानंतर नागझरीहून पाणी उचलण्यास प्रारंभ झाला़गतवर्षी लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई होती़ त्यानंतर पावसाळ्यात चांगला पाऊस पडला़ लातूर जिल्ह्यातील प्रकल्पासह शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले़ मात्र लातूर शहराची पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही, हे अनेकदा समोर आले आहे़ मांजरा प्रकल्पावरील ट्रान्सफॉर्मरची चोरी झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला़ पुन्हा वादळी वाऱ्यामध्ये वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊन पाणीपुरवठा खंडित झाला़ आता तर दोन पैकी एक पंप बंद झाला आहे़ गेल्या चार महिन्यांपासून हा पंप दुरूस्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आला आहे़ प्रशासनाकडून पंप दुरूस्तीसाठी पाठपुरावाच केला जात नाही़ जवळपास एक महिना उलटत असतानादेखील पंप दुरूस्ती होऊ शकला नाही़ त्यामुळे केवळ ३० ते ३२ एमएलडी पाण्यावर लातूरकरांना तहान भागवावी लागत आहे़ पाणी असताना मनपाच्या केवळ ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे़ आता नागझरीहून पाणी उचलण्यास नूतन महापौरांनी प्रयत्न केले़ परंतु, परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी मिळावे म्हणून, या प्रकल्पातून पाणी लातूरला देण्यास विरोध दर्शविला आहे़ वास्तविक पाहता नागझरी प्रकल्पातील १़५ एमएमक्यूब लातूर शहरासाठी आरक्षित आहे़ शेतकऱ्यांचे पाणी वगळून लातूर शहरासाठी हे पाणी आरक्षित आहे़ तशी सिंचन विभागाची परवानगीही लातूर मनपाला मिळालेली आहे़ मात्र शेतकऱ्यांनी गैरसमजातून विरोध केला़ नूतन महापौर सुरेश पवार यांनी नागझरी येथे शनिवारी सकाळी ११ वाजता जाऊन पंप सुरू केला़ नागझरीच्या शेतकऱ्यांची समजूत काढली़ मात्र टाकळी आणि जेवळीच्या शेतकऱ्यांनी पंप बंद केला होता़ परत या शेतकऱ्यांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर पंप सुरू झाला़ आता नागझरी येथून दररोज १५ एमएलडी पाणी उचलले जाणार आहे़ तर ‘मांजरा’तून ३० एमएलडी पाणी उचलून लातूर शहराला पुरवठा केला जाणार असल्याचे महापौर सुरेश पवार यांनी सांगितले़
नागझरीचे पाणी लातूरला देण्यास विरोध
By admin | Published: May 27, 2017 11:10 PM