औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील जलकुंभावरून सिडको एन-४ भागातील विविध वसाहतींना पाणी देण्यासाठी मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. पुंडलिकनगर, हनुमाननगर भागातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा या कामाला प्रखर विरोध दर्शविला. सोमवारी जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नालीत माती टाकण्याचे काम नागरिकांनी केले. जलवाहिनीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपामध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
सिडको एन-४ भागातील विविध वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून सिडको एन-५ येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलकुंभावरून नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. एन-४ पासून अत्यंत हाकेच्या अंतरावर पुंडलिकनगर येथील जलकुंभ आहे.
स्वतंत्र जलवाहिनीद्वारे एन-४ भागातील नागरिकांना पुंडलिकनगर जलकुंभातून पाणी द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत, प्रमोद राठोड यांनी केली आहे. महापालिकेने हे काम त्वरित करावे म्हणून अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. पुंडलिकनगर जलकुंभावरून एक थेंबही पाणी देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नगरसेवकांनी घेतली आहे. सेना-भाजप युतीच्या राजकारणात प्रशासन कात्रीत सापडले आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी ५०० मि.मी. व्यासाचे पाईपह या भागात आणून ठेवण्यात आले आहेत.
सिडको एन-४ परिसरातून पुंडलिकनगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकामही करून ठेवण्यात आले आहे. सोमवारी या घटनेची माहिती पुंडलिकनगर, हनुमाननगर भागातील नागरिकांना मिळाली. नागरिकांचा मोठा जमाव एन-४ भागात पोहोचला. तेथे त्यांनी खोदकाम करण्यात आलेल्या खड्ड्यात माती टाकून नाली बंद केली. यावेळी आत्माराम पवार, रामदास गायके, रामाराम मोरे यांच्यासह एल.डी. ताटू, संतोष खोंडकर, योगेश पवार, संगीता सदावर्ते, अरुणा बोराडे, अर्चना बोराडे, रेणुका चौैधरी, वृषाली पाटील, गीतांजली सोनवणे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.