छत्रपती संभाजीनगर : शासकीय जटिल अट, ऑनलाइन नोंदणीचा नियम व लालफितीच्या कारभारामुळेच शहरातील बांधकाम व इतर काम करणाऱ्या सुमारे २३ हजार कामगारांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे योजना?कामगारांचे हित पाहून त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून राज्य शासनाने कोरोनानंतर मजुरांचे स्थलांतर रोखताना व मजुरांची हालअपेष्टा टाळण्यासाठी रोज ‘जेवणाचा डबा’ पोहोचवण्याची सोय केली होती. हा डबा आधी शहरातील सुमारे ३० हजार कामगारांना दिला गेला. त्यावेळी कामगार मंडळाकडे रीतसर ‘कामगार’ म्हणून नोंद असलेल्या ३० हजार जणांचा समावेश झाला. परंतु, दरवर्षी ‘त्या’ नोंदणीचे नूतनीकरण असेल तरच हा डबा मिळेल, ही बाब बहुतांश जणांना कळालीच नाही. यामुळे ३० हजार कामगारांपैकी फक्त २३ हजार कामगारांवर आता यावर्षी उपासमारीची वेळ आली आहे. ही जाचक व जटिल अट ज्यांना समजली व त्यांनाच हा डबा सुरू ठेवता आला आहे, तो आकडा फक्त ७ हजार एवढाच आहे.
कैफियत काय?
जे कामगार ‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही. त्या कार्यालयात जायचे म्हटले की, रोजंदारी बुडते. यामुळे शासनाने कामगारांच्या कामाच्या ठिकाणीच शिबिर घेऊन नूतनीकरणाची मोहीम राबविण्याची गरज आहे. याशिवाय ‘कामगार’ नोंद करताना जी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे तीदेखील लगेच करून मिळावी, अशी माफक अपेक्षा या कामगारांकडून व्यक्त होत आहे.
मोबाइलवरील ऑनलाइन प्रक्रिया कशी करायची?कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन करताना त्या बिचाऱ्या कामगारांना या बाबी कळत नसल्याने ही प्रक्रिया सुलभ व सोपी करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. हंगामी मजुरांना फोन फक्त संपर्कासाठी असतो. अनेकांकडे मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासाठीही पैसे नसतात, त्यांना मोबाइलवर आलेला संदेश वाचताच येत नाही. मग ते ऑनलाइन कागदपत्र करण्यासाठी जाण्यास असमर्थ असतात. त्यांच्याकडून अनेकजण कागदपत्रांच्या नावाखाली फेऱ्या मारण्यास भाग पाडतात. फेऱ्या मारण्यात त्यांचा वेळ जातो अन् हातचे कामही जाते, असे दुहेरी आर्थिक नुकसान बांधकाम मजुरांना सोसावे लागते. यामुळे उपासमारीची वेळ येते. त्यामुळे कामगार कार्यालयानेच शिबिर घेऊन मजुरांची सोय करावी.- प्रेम चव्हाण, कामगार नेते
नियमानुसार नूतनीकरण हवेच...बांधकाम मजूर येथे आहे की, स्थलांतरित झाला. या नोंदीसह अजून बऱ्याच किरकोळ बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनदरबारी याचे टीपण करावे लागते. यासाठी दरवर्षी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. सध्या केवळ ७ हजार कामगारांचे टीपण आमच्याकडे आहे. जशीजशी कामगार नोंदणी वाढेल, तसे डबेही वाढतील.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त, कामगार