- विजय सरवदे
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांत ऑनलाईन कामाचा ट्रेण्ड आला आहे. यापासून शिक्षणही दूर राहिले नाही. मात्र, ऑनलाईन अभ्यास करताना बच्चेकंपनीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो म्हणून जि.प. शिक्षण विभागाने गावातील ४-५ मुलांचा समूह करून ओट्यावर त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.
त्याचे झाले असे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरू होतील, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. याबाबत शासनसुद्धा संभ्रमात आहे. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रामुख्याने ‘सीबीएसई’ शाळांनी ‘झूम अॅप’ किंवा ‘गुगल मीट’च्या माध्यमातून ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार जि.प. शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक तसेच दुसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यास प्रतिबंध घातला आहे.
यावर उपाय म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी एक अभिनव उपक्रम शिक्षण विभागाला सुचविला. भौगोलिकस्तरावर गावातील जि.प. शाळेच्या ४-४, ५-५ विद्यार्थ्यांचे लहान-लहान गट तयार करायचे. गावातीलच एखाद्या शिक्षित व्यक्तीकडून या गटाला फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळून लिहायला, वाचायला शिकवायचे. जो हे काम करतो त्यास पालकमित्र किंवा विद्यार्थीमित्र, असे संबोधले जाते. विद्यार्थीमित्र अथवा पालकाच्या व्हॉट्सअॅपवर किंवा जिथे इंटरनेटची रेंज कमी येते, अशा गावात शाळेचे शिक्षक काय शिकवायचे ते फोनवर सांगतात. हा उपक्रम सध्या १५ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद तालुक्यातील गारखेडा बीटमध्ये राबविला जात असून ४२ जि.प. शाळांचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.
...तर १ जुलैपासून सर्व जि.प. शाळांमध्ये हा प्रयोगयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, ग्रामीण भागात जर कोरोनाचा संसर्ग कमी झाला किंवा सध्यासारखी परिस्थिती राहिली, तर १ जुलैपासून हा पथदर्शी उपक्रम जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचा मानस आहे. यामुळे उपक्रमामुळे मुले शेतीत, जनावरामागे जाणे किंवा उनाडक्या करण्याऐवजी अभ्यासात रमतात. शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.