औरंगाबाद : राज्यात खळबळ उडविणाऱ्या तोंडोळी (ता. पैठण) येथील महिलांवर सामूहिक अत्याचार आणि दरोड्यातील आणखी तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यातील एक आरोपी मुंबईतून, तर दोघांना वैजापुरातून उचलण्यात आले. या गुन्ह्यातील सातपैकी सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले.
नंदू भागिनाथ बोरसे (वय ३५, रा. पालखेड, ता. वैजापूर), अनिल भाऊसाहेब राजपूत (२९, रा. मांजरी, ता. गंगापूर) किशोर अंबादास जाधव (४५, रा. गिधाडा, ता. पैठण) अशी मंगळवारी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. बोरसे आणि राजपूत यांना वैजापूर तालुक्यातील त्यांच्या नातेवाइकांच्या घरातून अटक केली, तर जाधवला सोमवारी रात्री उशिरा मुंबईतून अटक करण्यात आली.
तोंडोळी शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन कुटुंबांवर सात दरोडेखोरांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री दरोडा टाकला होता. लूटमार केल्यानंतर चार आरोपींनी दोन महिलांवर अत्याचार केले. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या प्रभू शामराव पवारच्या मुसक्या ४८ तासांत आवळल्यानंतर इतर आरोपी फरार झाले होते. नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सासरवाडीत लपून बसलेल्या योगेश प्रल्हाद जाधव या आरोपीला पोलिसांनी वेषांतर करून अटक केली. यानंतर सोमीनाथ बाबासाहेब राजपूत हा तिसरा आरोपी पकडला होता. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक ठुबे, किरण गोरे, नदीम शेख, पगारे, धापसे, तांदळे, घोलप यांच्या पथकाने केली.
चोरीला गेलेली दुचाकी जप्ततीन दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी तोंडोळी शिवारातील ज्या शेतवस्तीवर धुमाकूळ घातला तेथून एक दुचाकी पळविली होती. ही दुचाकी खंडाळा (ता. वैजापूर) येथील एका घरातून जप्त करण्यात आली. दरोडेखोरांनी दुचाकीचे इंजिन, चाके आदी पार्ट खोलून वेगवेगळे करून ठेवले होते.