औरंगाबाद : याचिकाकर्ता शंकर जगन्नाथ खेडकर यांना २६ एप्रिल २०२१ पासून सुरू होणाऱ्या फौजदार पदाच्या प्रशिक्षणास पाठविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्य शासनास दिला.
खेडकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) पदासाठीची लेखी परीक्षा सर्वसामान्य (क्रीडा) संवर्गातून उत्तीर्ण केली होती. परंतु, खेळाचे (क्रीडा) अधिकृत प्रमाणपत्र हरवल्यामुळे सादर केले नव्हते. त्यामुळे आयोगाने त्यांना शारीरिक चाचणीला बोलावले नव्हते. म्हणून त्यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठात मूळ अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणाने खेडकर यांना शारीरिक चाचणी आणि तोंडी मुलाखतीस बोलावण्याचा, तसेच खेळाडू प्रवर्गातील एक जागा रिक्त ठेण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यांचा मूळ अर्ज मॅट पुढे प्रलंबित आहे.
त्यांनी निदर्शनास आणून दिले की, शारीरिक चाचणी आणि तोंडी मुलाखत दिली आहे. २६ एप्रिल २०२१ पासून वरील पदाचे प्रशिक्षण सुरू होत आहे. सर्वाधिक १७६ गुण असलेल्या उमेदवाराला प्रशिक्षणास पात्र ठरविले आहे. याचिकाकर्त्यास एकूण २१० गुण मिळाले आहेत. शिवाय दरम्यानच्या काळात त्यांचे हरवलेले खेळाचे प्रमाणपत्र सापडले असून, त्यांनी ते संबंधितांकडे दिले आहे. सुनावणीअंती या सर्व बाबीचा विचार करून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.