औरंगाबाद : जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे अडत बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यातच जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटलच तूर खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आल्याने शेतकरी संतापले होते. अखेर, मंगळवारी शासनाने नवीन आदेश काढले.
शासनाच्या नवीन आदेशाची प्रत, सायंकाळपर्यंत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाली नव्हती. मात्र, माहिती मिळताच तूर खरेदी केंद्रावर लगेच नवीन आदेशाची अंमलबजावणी करणे सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडीतील कृउबा समितीच्या परिसरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले होते. त्यावेळीस हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदीचे शासनाचे आदेश होते. उद्घाटन सोहळ्यात तूर उत्पादकांनी मागणी केली की, यंदा तुरीचे उत्पादन वाढले आहे. यामुळे तूर खरेदीची मर्यादा वाढून देण्यात यावी. याचे गांभीर्य ओळखून बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सचिवांशी चर्चा केली. त्याचे फलित म्हणजे आज नवीन आदेश काढण्यात आले. त्यात हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे पत्र मार्केट फेडरेशनला मिळाले. त्यांच्याकडून आम्हाला फोनवर माहिती मिळताच आम्ही त्याची दुपारनंतर अंमलबजावणी सुरू केली आहे. सोमवारी तूर खरेदी केंद्रावर याच मुद्दावर शेतकर्यांनी संताप व्यक्त केला होता. फक्त ५.५ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली, तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे, असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला होता. यास ‘लोकमत’ने वाचा फोेडली होती. नवीन आदेश आल्यामुळे शेतकर्यांनी समाधन व्यक्त केले.
दोन दिवसांत ४८ क्विंटल तूर खरेदी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात दोन दिवसांत ४७ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली. ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला जात आहे. शेतकर्यांकडून प्रतिहेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ज्यांनी दोन दिवसांत केंद्रावर तूर विक्री केली त्या शेतकर्यांकडून नवीन आदेशानुसार उर्वरित ७ क्विंटल ९२ किलो तूर खरेदी करण्यात येणार आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती