पैठण : अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून सात दिवसाच्या आत नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिले आहेत. पैठण तालुक्यात यंदा २९ सप्टेंबरअखेर सरासरी पेक्षा २७२.७० मिमी जास्त पावसाची नोंद झाली. दहा महसूल मंडळापैकी तीन मंडळात १००० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
या पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले. मुगाच्या शेंगांना पुन्हा कोंब फुटले, मोसंबीला गळ लागली, उभा असलेला तुर, ऊस शेतातच आडवा झाला. डाळिंब गळून पडले. यामुळे शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडले आहेत.
पैठण तालुक्यातील लागवडी खालील क्षेत्रापैकी जवळपास ६५% पिकांचे नुकसान झाले असून पेरणीसाठी केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यशासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. पैठण तालुक्यातील पंचनामे करण्यासाठी नाथमंदीर परिसरातील किर्तन हॉलमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी विजय लोंढे, कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, कृषी सहायक, व तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.