उच्च न्यायालयाचा आदेश; परीक्षा केंद्राला ठोठावला लाख रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:29 AM2020-02-22T03:29:04+5:302020-02-22T06:56:09+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश; जमिनीवर बसून १२ वी परीक्षा देण्याची गंभीर दखल
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत अतुल कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला तीन आठवड्यांत एक लाख रुपये ‘कॉस्ट’ खंडपीठात जमा करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी हा आदेश दिला. कॉस्ट कमी करण्याची त्यांची विनंती खंडपीठाने नामंजूर करीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान त्यापेक्षा किती तरी पटींनी जास्त असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीसाठी परीक्षा केंद्रप्रमुख एस. बी. सय्यद आणि उप केंद्रप्रमुख विष्णू मिसाळ हेसुद्धा जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवीत अॅड. सत्यजित बोरा यांच्या विनंतीनुसार दोघांना प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे निर्देश देत खंडपीठाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे.
विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले?
कोणतीही व्यक्ती ४० मिनिटे ते एक तासभरच जमिनीवर बसून उत्तरे लिहू शकते. १८ फेब्रुवारीला जमिनीवर बसून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले होते, याचा खुलासाही खंडपीठाने संबंधितांकडून मागविला आहे. अशा अवघड परिस्थितीत विद्यार्थी नापास झाले, तर त्यात त्यांची काहीही चूक नसल्याचे खंडपीठाने मत व्यक्त केले.