औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांकडून आरटीओ कार्यालयात ५० रुपयांत अवघ्या ५ मिनिटांत नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची खैरात दिल्याची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घाटीतील मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उद्धव खैरे यांच्याकडून आरटीओ कार्यालयात कोणत्याही तपासणीविनाच वैद्यकीय प्रमाणपत्र देत होते. हा प्रकार ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजी ‘घाटीतील प्राध्यापकांची आरटीओत सेवा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकरणाने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण थेट वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयापर्यंत पोहोचले आहे.
‘डीएमईआर’ने या प्रकरणाविषयी घाटी प्रशासनाकडून माहिती घेत, संपूर्ण प्रकाराची बारकाईने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चालकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नव्हती. चौकशी दरम्यान, या सगळ्या बाबींची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे आता चौकशी होऊन संबंधित सहयोगी प्राध्यापकांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेडिसिन विभागात सहयोगी प्राध्यापक आणि पथक (युनिट) क्रमांक-५ चे प्रमुख म्हणून डॉ. खैरे कार्यरत आहेत. डॉ. खैरे आरटीओ कार्यालयात थेट एजंटांच्या गराड्यात उभे राहून वैद्यकीय प्रमाणपत्र देत होते. तेही कोणत्याही वैद्यकीय तपासणीविना. या प्रकाराने घाटी रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांकडून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
चौकशीनंतर कारवाईयाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय