पैठण येथील नाथषष्ठी यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने रद्द केली आहे. असे असले तरी वारकरी मोठ्या संख्येने पैठणला हजेरी लावतात. हा गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना नाथांच्या मूकदर्शनालाही मुकावे लागणार असल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली आहे.
पंढरपूर आषाढीनंतर नाथषष्ठीच्या वारीचे मोठे महत्त्व वारकरी संप्रदायात आहे. नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या व लाखो वारकरी पैठण नगरीत दाखल होतात. यंदा मात्र प्रशासनाने अगोदरच यात्रा रद्द केली आहे. तुकाराम बीजेस नाथांच्या वाड्यातील पवित्र राजणाची विधिवत पूजा करून नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यात आल्याने नाथषष्ठीसाठी वाहनाने वारकरी येण्याच्या तयारीत आहेत. नाथषष्ठीची वारी खंडित होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने दिंड्यातील वारकरी दर्शनासाठी गतवर्षी आले होते. त्याचप्रमाणे यंदाही वारकरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदिर पूर्णत: उघडे ठेवू नका, मंदिर उघडे ठेवण्यासाठी काही कालावधी निश्चित केला जावा, असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त व नाथवंशजांना बुधवारी दिले.