सुनील घोडके
खुलताबाद : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कुटुंब सर्वेक्षणाचे काम असतानाच, आज परत त्यांना स्वस्त धान्य दुकानाची ड्युटी देण्यात आल्याने शिक्षक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकाचवेळी दोन-दोन जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्यात, असा प्रतिप्रश्न त्यांनी प्रशासनास केला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले असून हा आजार कुणाचा कधी बळी घेईल हे सांगता येत नाही. अशा प्रचंड भयावह परिस्थितीत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक कोरोना योध्दा म्हणून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रशासन सांगेल त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे शिक्षक काम करतात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून केले जाणारे गावपातळीवरील रुग्णांचे सर्वेक्षण, लसीकरण नोंदणीबाबतचे काम, चेक पोस्टवर तपासणी, आदी कामे चोखपणे बजावली जात आहेत. परंतु खुलताबाद प्रशासनाकडून एका शिक्षकाकडे एकच काम देणे अपेक्षित असताना, एकाचवेळी दोन-दोन कामांचे आदेश दिले जात आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः मागीलवर्षी ज्या शिक्षकांना स्वस्त धान्य दुकानावर ड्युट्या दिलेल्या होत्या, त्याच शिक्षकांना फक्त तारखेत बदल करून जशीच्या तशी ऑर्डर काढली गेली आहे.
एका-एका शिक्षकास एकच काम देण्यात यावे. फक्त प्राथमिक शिक्षकांनाच नव्हे, तर त्या त्या गावातील इतर कर्मचाऱ्यांकडेही काही कामे सोपवण्यात यावीत. कोरोना कालावधीत कर्तव्य बजावताना अजून किती गुरुजींचा बळी घेणार, असा प्रश्न आहे.
- सतीश कोळी,
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती, खुलताबाद