छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता डी.डी. उकीर्डे हे जुनमध्ये सेवानिवृत्त होणार असून तत्पूर्वीच अमरावती विभागातून श्रीनिवास कातकडे यांची बदली उकीर्डे यांच्या जागेवर करण्यात आली आहे. ‘वराती मागून घोडे’ या प्रचलित म्हणीऐवजी ‘वरातीच्या आधीच घोडे,’ ही नवी म्हण बांधकाम विभागाच्या या प्रकारामुळे प्रचलित झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात बांधकाम विभागातील बदल्या परस्पर होत असल्या कारणाने नाराजी व्यक्त केल्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले. त्यांच्या त्या विधानात सत्यता असल्याचे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे.बांधकाम विभागाने शुक्रवारी (दि.२८) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती विभागातील अभियंता श्रीनिवास कातकाडे यांची बदली मराठवाडा विभागात केल्याची ऑर्डर काढली. समाजमाध्यमातून व्हायरल झालेली ही ऑर्डर ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. सध्या कार्यरत असलेले मुख्य अभियंता उकीर्डे यांच्या सेवानिवृत्तीने हे पद रिक्त होताच, मुख्य अभियंता पदाचा पदभार कातकडे यांनी स्वीकारून शासनाला अहवाल सादर करावा, असे शासनाचे कार्यासन अधिकारी गंगाधर गायकवाड यांनी काढलेल्या ऑर्डरमध्ये नमूद केले आहे.
बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा धुमाकूळ सुरू आहे. मंत्रिपदी जरी चव्हाण असले तरी त्यांना डावलून हा बदल्यांचा खेळ कोण चालवत आहे, यावरून सरकारमध्ये अंतर्गत खदखद वाढू शकते. मेअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल्या होणार असून त्यामध्येही चव्हाणांना विश्वासात घेतले आहे की नाही, याबाबत साशंकता आहे.
६० दिवस आधीच उडविला बार...६० दिवसांनी उकीर्डे सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य अभियंता पदावर कुणाची तरी बदली करता आली असती. परंतु, तसे न करता आधीच व्यक्ती शोधून बदलीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामुळे कुणी मॅटमध्ये जाईल, हे सांगता येत नाही. प्रवीण किडे नंतर महिन्याभराने एम. एम. सुरकूटवार हे मुख्य अभियंता म्हणून आले. नंतर के.टी. पाटील यांच्या बदलीनंतर दीड महिन्याने उकीर्डे यांची ऑर्डर निघाली. यावेळी दोन महिने आधी ऑर्डर निघाल्याने सरकारमध्ये काय चाललं आहे, यावरून बांधकाम विभागात कुजबुज सुरू आहे.