राजेश भिसे , जालना मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करु शकला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत. असे असले तरी देशभरात अवयव निकामी होऊन मृत्यूू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. जगभरात अवयवदात्यांची संख्या मोठी आहे. ती देशातही वाढावी, यादृष्टिने केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. राज्यातही ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे तीन दिवस महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान न राहता ती लोकचळवळ झाली तरच अनेकांचे प्राण वाचू शकतील. डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लिहा यासारख्या अवयवांची मनुष्याला अमूल्य भेट मिळालेली आहे. ही निसर्गाने दिलेली अवयवरुपी भेट मृत्यूनंतर इतर गरजू रुग्णांना दान देता येऊ शकते. या अवयवदानाने मृत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देऊ शकतो. सद्यस्थितीत देशात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, पन्नास हजार यकृत, दोन हजारांहून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून, त्यांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुध्दिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुफ्फुस विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना असा कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासाठी हे महाअवयदान अभियान वरदान ठरु शकते. अवयवदानाचे प्रमाण भारतापेक्षा इतर देशांत अधिक असून, त्या देशांची व तेथील जनतेपासून प्रेरणा घेऊन आपणही आता एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे. विचारांच्या जुन्या शृंखला तोडून नव्या विचारांची कास धरली पाहिजे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृती हा अमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाचे महत्त्व कळल्यास त्यासाठी त्यांची संमती सहज मिळू शकेल आणि तेही त्यासाठी प्रेरित होऊ शकतील. मात्र, त्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची. महाअवयवदान अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारनेही कंबर कसली असून, त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अगदी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर अभियान राबविले जाणार असले तरी सामाजिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा या अभियानात सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. भारतात मानुष्याचे अवयव निकामी होण्याचे प्रमाण अलिकडे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यास मानवनिर्मित बाबी कारणीभूत असल्या, तरी त्याचे चर्वितचर्वण करीत बसणे उचित ठरणारे नाही. लोकांची मानसिकता बदलून इतर देशांप्रमाणे आपणही आदर्श जीवन पध्दतीचा स्वीकार केला आहे. मग अवयव दानासारखे पवित्र कार्य करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढे आले पाहिजे. हे राबविताना ‘महा’ विक्रम स्थापित करुन ती लोकचळवळ झाली तरच अभियानाचा उद्देश सफल होईल.
अवयवदान अभियान लोकचळवळ व्हावी
By admin | Published: August 28, 2016 12:06 AM