बेटी बचाओ, बेटी पढाओ : मालुंजा येथील शाळाचालकाचा आदर्शगंगापूर : गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील आयडियल इंग्लिश शाळेच्या संस्थापकाने आपल्या शाळेत कामाला असलेल्या महिला कर्मचारी रंजना यांच्या मुलीचा लग्नसोहळा स्वखर्चाने उरकला .अशोक राठोड या संस्थाचालकाचे नाव आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुरु केलेली शाळा त्यांनी नावारूपाला आणली. शाळेबरोबरच राठोड यांनी समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या वाक्याला अनुसरून एक मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेतली. येथेच न थांबता त्यांनी एका पाठोपाठ तीन मुली दत्तक घेवून त्या मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेतली. दत्तक घेतलेल्या मुलींमध्ये सिद्धी भाऊसाहेब राशीनकर (तांदुळवाडी), ईश्वरी नितीन कान्हे (कायगाव), भक्ती अप्पासाहेब जीवरक (मालुंजा) यांचा समावेश आहे. मालुंजा येथील आयडियल इंग्लिश शाळेत रंजना अशोक त्रिभुवन नावाची महिला कामाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती जरा बेताचीच आहे. त्यांची मुलगी मोनाली उपवर झाली, मात्र लग्न लावून देण्यापुरती व्यवस्था नसल्याने रंजना त्रिभुवन चिंतेत होत्या. मुलगी मोनाली व संदीप आमराव यांची सोयरिक जमली. मात्र लगेच लग्न सोहळा आटोपण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध नव्हता. ही बाब संस्थाचालक राठोड यांच्या कानी पडली. त्यांनी हा लग्न सोहळा आपणच स्वखर्चाने करून देणार अशी ग्वाही रंजना त्रिभुवन यांना दिली. राठोड यांचा खर्च करण्याचा होकर मिळताच मोनालीच्या आईस आकाश ठेंगणे झाले. त्यांनी लगेच लग्नाची तयारी दर्शवून राठोड यांना आपणच लग्नतिथी शोधून हे कार्य उरकावे, असे म्हटले. त्रिभुवन यांची मनस्थिती हेरून राठोड यांनी आ. प्रशांत बंब, श्रीराम साळुंके, सुनीता अशोक राठोड, अर्चना गणेश सुकाशे, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, दीपक साळवे, संस्थेचे कोषाध्यक्ष अतुल रासकर, अमोल साळवे, कृष्णकांत व्यवहारे, गोपीचंद चव्हाण, विद्यार्थी पालक, नातेवाईक यांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात मोनाली व संदीपचा लग्नसोहळा लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.