औरंगाबाद : सिनेरसिकांना पर्वणी ठरलेल्या ‘एआयएफएफ’अर्थात औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या पर्वाची घोषणा आज करण्यात आली. १८ ते २१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटर येथे बदललेल्या स्वरुपात रंगणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठवाड्यातील सिनेरसिकांपर्यंत देश व जगभरात गाजलेले उत्कृष्ट चित्रपट पोहोचविणार्या ‘एआयएफएफ’चे हे पाचवे वर्ष आहे. नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे आयोजित हे पर्व नव्या बदलासह असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘रुख’ हा बहुचर्चित सिनेमा महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ असेल. याचे दिग्दर्शक अतनू मुखर्जी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधतील.
महोत्सवादरम्यान स्पर्धा विभागातील सर्व चित्रपटांशी संबंधित दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित असतील. तसेच अभिनेते डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, उपेंद्र लिमये, अलोक राजवाडे, इरावर्ती कर्वे, दिग्दर्शक हंसल मेहता, गिरीश मोहिते, पटकथाकार संध्या गोखले आदी नामवंत मंडळी उपस्थित राहणार असून, या महोत्सवाचा सिनेरसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागाचे प्रमुख अंकुशराव कदम, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, महोत्सव निमंत्रक नीलेश राऊत, समन्वयक शिवदर्शन कदम, डॉ. आनंद निकाळजे, प्रिया धारूरकर यांची उपस्थिती होती.
स्पर्धा गटाची सुरुवात यावेळी महोत्सवात पहिल्यांदाच ‘भारतीय सिनेमा स्पर्धा’ गटाचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध भारतीय भाषांमधील ९ सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सर्वोत्तम चित्रपटास रोख रकमेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण, संकलन, ध्वनी संकलन, कलाकार (स्त्री/पुरुष) असे वैयक्तिक पुरस्कारसुद्धा देण्यात येतील. पुरस्कारांची निवड ५ आंतरराष्ट्रीय ज्युरीद्वारे करण्यात येईल. ज्युरी समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक विकास देसाई असतील. तर सदस्य म्हणून प्रा. एमी कॅटलीन (अमेरिका), समीक्षक सैबल चटर्जी (दिल्ली), नाटककार अजित दळवी (औरंगाबाद ) व चित्रपट अभ्यासक सुजाता कांगो (औरंगाबाद ) हे असतील.
मास्टर क्लास व परिसंवाद शुकवारी (दि.१९) आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक हंसल मेहता निवडक चित्रपट अभ्यासकांसोबत मास्टर क्लासच्या माध्यमातून संवाद साधतील. तसेच शनिवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजता ‘मराठी चित्रपट व जागतिक व्यासपीठ’ या विषयावर परिसंवाद होईल. यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संदीप सावंत, क्रांती कानडे, सुमित्रा भावे व मिलिंद भावे यांचा सहभाग असेल.
पोस्टर प्रदर्शन व कार्यशाळा दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या निवडक ५० चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन सोमवार (दि.१५) पासून प्रोझोन मॉल येथे भरविण्यात येणार आहे. यासोबतच महोत्सवाआधी शहरातील १० महाविद्यालयांत समीक्षकांच्या उपस्थितीत चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होईल.
प्रतिनिधी नोंदणी महोत्सवात सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, शहरात ८ ठिकाणी याचे केंद्र सुरू असतील. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीच्या दरात नोंदणी करता येईल. नोंदणी केंद्रांची नावे - १. आयनॉक्स, प्रोझोन, २. निर्मिक ग्रुप, सूतगिरणी रोड, ३. महात्मा गांधी भवन, समर्थनगर, ४. विशाल आॅप्टिकल, निरालाबाजार, ५. हॉटेल स्वाद, उस्मानपुरा, ६. हॉटेल नैवेद्य, सिडको, ७. साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा, ८. जिजाऊ मेडिकल, टी. व्ही. सेंटर.
चित्रपटांची पर्वणी संपूर्ण महोत्सवात सहा वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रपट दाखविण्यात येतील. यात स्पर्धा गट- ९, एशियन बेस्ट- ७, वर्ल्ड सिनेमा- ५, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त- ४, हंसला मेहता यांची ३ व अमोल पालेकर दिग्दर्शित अनाहत, अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची पर्वणीच रसिकांना असणार आहे.
समारोप महोत्सवाचा समारोप दिग्दर्शक पद्मविभूषण गोपाल कृष्णन यांच्या हस्ते रविवारी (दि. २१) सायं. ७ वाजता होईल. यावेळी अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.