औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे लातुर आणि उस्मानाबाद येथे जिल्हास्तरावर खुली जन-सुनावणीचे आयोजन केले आहे. लातुर येथे २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहात ही जनसुनावणी होणार आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, मराठाआरक्षणासंदर्भात मराठवाड्यात ठिकठिकाणी खुली जनसुनावणी घेण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यामध्ये लातुर येथे २६ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहात आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य डॉ. राजेश करपे आणि रोहीदास जाधव यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होईल. यात लातुर जिल्ह्यातील नागरिक, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींकडून लिखित स्वरूपात निवेदने स्विकारण्यात येतील. तर २७ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ ते ४ या वेळेतच जनसुनावणी होणार आहे.
या जन-सुनावणीत व्यक्तीगत, शिष्टमंडळांशी चर्चा केली जाणार नाही. मराठाआरक्षणासंदर्भात सादर करावयाचे निवेदने, पुरावे, तथ्ये, माहिती, प्रतिपादन, दस्त-ऐवज इत्यादी जे काही द्यायचे असेल ते सर्व लिखित स्वरूपातच स्वीकारण्यात येणार असल्याचेही राज्य मागस वर्ग आयोगातर्फे स्पष्ट केले आहे. या जनसुनावणीत जास्तीत जास्त नागरिक, संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाड्यातील आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी केले आहे.